Welcome

My mission is to empower people to find inner clarity and personal happiness through simple, uplifting, motivational, and applicable articles.

खरे अध्यात्म (True Spirituality)

August 19, 2015

अध्यात्म अनुसरायचे किंवा शिकायचे म्हणजे दैनंदिन जीवनातील उपभोगाच्या सर्व वस्तूंचा , खाद्यपदार्थांचा त्याग करायचा , असे बऱ्याचजणांना वाटते. थोडक्यात , अध्यात्माची सांगड बरेचदा संन्यासाशी घातली जाते. रोजच्या जीवनात , आपल्या आचरणातच आपण अध्यात्म आणू शकलो तर खऱ्या अर्थाने आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल आणि तो समाजाला उपयोगी पडेल.

चित्रलेखा नावाच्या अभिसारिकेची कथा सर्वश्रुत आहे. एका मोठ्या धर्मगुरूचे दोन शिष्य तिच्याकडे राहायला येतात. तिच्यासारख्या अभिसारिकेजवळ राहून पाप काय आणि पुण्य काय याचा शोध त्या दोघांनी घ्यायचा , असा धर्मगुरूंचा आदेश असतो. चित्रलेखा श्रुंगाराचे , ऐषआरामाचे आयुष्य जगत असते. परंतु मनाने अत्यंत पवित्र , निरागस असते. याउलट ज्या धर्मगुरूंनी आपल्या शिष्यांना तिच्याकडे पाठविलेले असते , ते चित्रलेखाला भेटतात , तेव्हा तिचे अप्रतिम सौंदर्य पाहून त्यांचाच पाय घसरतो , मन ‌विचलित होते. शेवटी त्या शिष्यांना हे समजून चुकते की , अमका व्यवसाय केला म्हणून कोणी पापी आहे असे नाही आणि धर्मगुरू झाले म्हणून ते पुण्यवान आहेत असे नाही. पाप-पुण्य आपल्या मनात असते आणि ते आपल्या आचरणात उतरत राहते.

दुसरी कथा राजा जनकाची आहे. एकदा शुकदेव राजा जनकाकडे येतात. म्हणतात , ' तुला सगळेजण संन्यासी राजा किंवा श्रीमंत योगी असे म्हणतात. तू तर राजमहालात राहतोस. सगळी सुखे उपभोगतोस. तू कसा योगी ?' त्यावर जनक राजा शुकदेवांना विनम्रपणे म्हणतात , ' तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी थोड्या वेळानंतर देतो. तत्पूर्वी आपण माझा महाल पाहावा अशी माझी इच्छा आहे. परंतु तो पाहताना मी आपल्या हातात तेलाने भरलेला एक दिवा देणार आहे. तो घेऊन आपण महालभर फिरावे. मात्र त्या दिव्यातील एक थेंबही तेल खाली सांडू नये याची दक्षता घ्या , एवढी विनंती मी आपणांस करीत आहे. '
जनकाने सांगितल्यानुसार शुकदेव महाराज दिवा घेऊन निघाले. संपूर्ण महाल पाहून परत आले. दिव्यातील तेल जराही सांडलेले नव्हते. परत आल्यावर शुकदेव महाराज स्थानापन्न झाले. जनकाने त्यांना विचारले , ' महाराज , माझ्या महालात आपल्याला काय काय दिसले ? ऐश्वर्याच्या किती खुणा सापडल्या ?' त्यावर शुकदेव महाराज म्हणाले , ' मला तर महालात काहीच आढळले नाही ; कारण माझे लक्ष सतत दिव्यावर व त्यातून सांडणाऱ्या तेलावर होते. ' जनक हसून त्यांना म्हणाले , ' महाराज , माझेही तसेच आहे. हे ऐश्वर्य उपभोगण्याची सवडच मला नाही ; कारण जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र मला लक्ष ठेवावे लागते. ' शुकदेव महाराजांनी जनकाचे श्रीमंत योगीपण मान्य केले.
उपभोगाची लालसा मनी ठेवून धनदौलत गोळा करणे , कपड्यालत्त्यांवर वारेमाप खर्च करणे , हे अध्यात्माचे लक्षण नाही. आपल्याकडे ऐश्वर्य असल्यास त्याचा उपभोग घेणे चुकीचे नाही ; मात्र आपल्या समृद्धीचा , ऐश्वर्याचा उपभोग घेता घेता आपली कर्तव्ये पार पाडणे आणि जेव्हा जेव्हा शक्य होईल , तेव्हा दुसऱ्यांना मदत करणे हेच खरे अध्यात्म होय. 


स्त्रोत- नीला सत्यनारायण (महाराष्ट्र टाइम्स)